Breaking

शिक्षण विभाग, पंचायत समिती , मोर्शी


"आयुष्यात आपण किती वेळा हरला आहे
काही फरक पडत नाही,
कारण तुमचा जन्म जिंकण्यासाठी झाला आहे !!...
.”.

Showing posts with label नवीन प्रकल्प / उपक्रम. Show all posts
Showing posts with label नवीन प्रकल्प / उपक्रम. Show all posts

Wednesday, March 11, 2020

Wednesday, March 11, 2020

जिल्हा परिषद उर्दू शाळा शिरखेड येथे विद्यार्थ्यांची “विज्ञान जत्रा”

जिल्हा परिषद उर्दू शाळा शिरखेड येथे विद्यार्थ्यांची “विज्ञान जत्रा

 दरवर्षीप्रमाणे जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक उर्दू शाळा शिरखेड येथे दिनांक २६ जानेवारी २०२० रविवार रोजी सकाळी ८.०० वाजता शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.शेख.फारुख यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पारडला.तद्नंतर शाळेत स्वयं निर्मित टाकाऊ वस्तू पासून तयार केलेल्या झिरो बजेटविज्ञान प्रयोग शाळेचे “विज्ञान जत्राया उपक्रमाच्या माध्यमातून प्रदर्शनी लावण्यात आली.
 विद्यार्थ्यांनी सर्व मान्यवर व ग्रामस्थांच्या समोर सादरीकरण केले तसेच
विविध साहित्य व खाद्यपदार्थांच्या मदतीने प्रत्यक्ष प्रयोग करून दाखविले.प्रयोग पाहून उपस्थितांनी प्रश्न विचारून वैज्ञानिक संबोध सुद्धा समजून घेतले.गावपातळी वर घेण्यात आलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी समस्त पालक व मान्यवरांनी मुख्याध्यापकासह सर्वशिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.गावातील इतर सर्व शाळांचे शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी विज्ञान जत्रेला भेट दिल्याने कार्यक्रमात अतिउत्सहात्मक वातावरण होते.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्साह, त्यांची कल्पकता, प्रयोगांची विविधता व दर्जा, ग्रामस्थांची उत्सुकता आणि उत्स्फूर्त प्रतिसाद आणि त्यांची शाळेबद्दलची आपुलकी सर्वच कौतुकास्पद होते.
या कार्यक्रमाला मा.श्री.प्रमोदराव बोबडे उद्घाटक, सौ.सुनंदाताई तागडे(सरपंच,शिरखेड) अध्यक्षा तथा सौ.अश्विनी पवार(ग.शि.अ.मोर्शी) प्रमुख अतिथी म्हणून लाभले.तसेच श्री.विकासराव तट्टे(उपसरपंच), युनुस खान मोहम्मद खान, गजानन तेलमोरे, सौ.शिवकन्या ताई खराते, खलीलअहमद खान, जाहीर खान, मो.सादिक, शेख.जमील, अविनाश राते, शाळेतील शिक्षक मो.रिजवान सर, मुशताक शाह सर, सीमा अंजुम मैडम, व इतर पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री.मो.मुजाहिद सरांनी तथा संचालन शकील अहमद सरांनी केले.

Monday, December 23, 2019

Monday, December 23, 2019

मोर्शी तालुका - १००% तंबाखूमुक्त शाळांचा तालुका

यशोगाथा  १००% तंबाखूमुक्त शाळांचे तालुक्याची
होय, हे शक्य झाले आहे...........
 सर्वप्रथम मोर्शी तालुका
१००% तंबाखूमुक्त शाळांचा तालुका झालेला आहे त्याबद्दल तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांचे आणि या अभियानास साहाय्य करणाऱ्या टीम चे मनः पूर्वक अभिनंदन आणि आभार !!!!!
   
आपणास कळविण्यास अभिमान वाटतो की, मोर्शी हा अमरावती जिल्ह्यातील प्रथम तसेच राज्यातील आठवा तंबाखूमुक्त शाळांचा तालुका झालेला आहे. अवघ्या ३ महिन्यांच्या  कालावधीत आपण हे यशाचं शिखर गाठलं आहे. अभियानाला सुरुवात करण्याअगोदर तालुक्यातील फक्त तीनच शाळा तंबाखू मुक्त शाळा म्हणून घोषित करण्यात आलेल्या होत्या. आणि अल्पावधीतच आपण आपलं उद्दिष्ट गाठण्यात यशस्वी झालो.
विशेषतः वरिष्ठ स्तरावरून कुठलाच लेखी
आदेश नाही की कुठलीच जबरदस्ती नाही.
तंबाखू मुक्त अभियानात सर्वांनी स्वयंस्फूर्तीने मनापासून काम केलं आणि हे या अभियानाचं सर्वात मोठं वैशिष्ट.
 अभियानाची पार्श्वभूमी
शासन परिपत्रक दि.०६ जून २०१९ नुसार सर्व शैक्षणिक संस्थामध्ये तंबाखूमुक्त शाळा धोरण राबविणे
आवश्यक आहे.
 अभियानाचं उद्दीष्ट
ग्रामीण तसेच शहरी भागातील मुलांच्या आरोग्यावर चांगला परिणाम करण्यासाठी विविध सामाजिक घटकांना एकत्र करून शाळा तंबाखू मुक्त करणे. यासोबतच शालेय शिक्षणातून तंबाखू नियंत्रण, स्वच्छता आणि पोषणमूल्य या संदर्भात माहिती देणे. आणि समाजात शाश्वत बदल घडवून मूल तंबाखूमुक्त निरोगी आयुष्य जगू शकेल.  .
बालपणी व्यक्तीचं  मन संस्कारक्षम असतं. बालपणी तुमच्या सोबत जे घडते त्यानुसार तुमचे चारित्र्य आणि व्यक्तिमत्त्व आकार घेते. आणि तेच तुमच्या जीवनावर राज्य करते. शाळा तंबाखू मुक्त करतांना अनेकांच्या मनात असा प्रश्न आला असेल की, मी किंवा माझे विद्यार्थी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करीत नाही तेव्हा शाळा तंबाखू मुक्त करण्याची गरजच काय? पण या कार्यक्रमातून आपण त्या बालमनावर तंबाखू सेवनाची दाहकता कोरली आहे. ज्या योगे तो/ती भविष्यात तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहील. आणि तंबाखूचे दुष्परिणाम, चांगले आरोग्य या बाबतचे ज्ञान आत्मसात करून स्वतः तंबाखू मुक्त आरोग्य संपन्न जीवन निर्वाह करतील.
 अभियानाची अंमलबजावणी
तालुक्यातील  सर्व शाळांपर्यंत योग्य माहिती पोहचविण्यासाठी तसेच सलाम मुंबई फाउंडेशन च्या app वर  पुरावे सादर करण्याच्या प्रक्रीये विषयी साहाय्य करण्यासाठी तंबाखू मुक्त तालुका टीम चे गठन करण्यात आले. या टीम मध्ये
१) श्री. मनीष काळे
२) श्री.राजकुमार खर्चान
३)श्री.दिनेश साबळे.
४) सौ. सीमा पाटील       
५)सौ.प्रियंका काळे
६)श्री. सुरेश डोंगरदिवे
७)श्री. निलेश इंगोले
८)श्री.सूरज अंबाडकर
९)श्री.मुजाहिद फराज.
१०)श्री.श्रीकांत खाजोने
११)श्री.अमित काकपुरे
१२)श्री. मुश्ताक शाह
१३)श्री. धनराज कुंजेकर
१४)श्री. संजय धांडे
१५)श्री. अमोल अर्मळ
 या सर्व सदस्यांना शाळा निहाय जबाबदारी सोपविण्यात आली. शाळांच्या मुख्याध्यापकांनी तसेच शिक्षकांनी अभियानाला उस्फूर्तपणे प्रतिसाद देऊन दि.१५ सप्टे.२०१९ ला सुरु झालेल्या या अभियानाला दि.१२ डिसेंबर २०१९ रोजी पूर्णत्वास नेऊन तालुक्याचे नाव या अभियानात संपूर्ण अमरावती जिल्ह्यात अव्वल स्थानी नेले.
अभियानाची सद्यस्थिती 
पंचायत समिती मोर्शी मधील शाळा बाबत  माहिती
जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या १०२ पैकी १०२ शाळा आणि इतर व्यवस्थापनाच्या(नगरपरिषद आणि खाजगी) ३४ अशा एकूण १३६ शाळा आज रोजी पर्यंत तंबाखूमुक्त शाळा म्हणून सलाम मुंबई फाउंडेशन द्वारा मान्यताप्राप्त झालेल्या आहेत.
  होय, आपणा सर्वांच्या सहकार्याने हे शक्य झाले आहे. मी पेक्षा आम्ही हे या तंबाखूमुक्त शाळांचा तालुक्याच्या यशाचं गुपित आहे. जीवनात लहानशी गोष्ट असं काहीच नसतं. बऱ्याचदा अश्या या लहान-लहान गोष्टीच मोठा बदल घडवून आणतात.
💐💐💐💐💐💐💐
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्व कटिबद्ध आहोत या खात्रीसह.........
                                गटशिक्षणाधिकारी
                                   पं. स. मोर्शी

Thursday, November 21, 2019

Thursday, November 21, 2019

सन्मान प्रेरणेचा .......सन्मान गुणवत्तेचा


प्रिय,
शिक्षक बंधू आणि भगिनी

   बालकांचा मोफत शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अन्वये शिक्षण क्षेत्रात काम करणारे आपण सर्व जण आपल्या अधिनस्त  विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी कटीबद्ध आहोतच.आणि आपण सर्व जण त्या साठी प्रयत्नशील सुद्धा आहोतच ह्यात शंका नाही. पण दिवसेंदिवस वाढत जाणारा कामाचा विस्तार जरी तो कालानुरूप अपरिहार्य असला तरीही मात्र कामाची दिशा, जवळ असणारी वेळ आणि उपलब्ध साधन स्रोत ह्याचा ताळमेळ जुळवतांना आपल्या सर्वांच्या नाकी नऊ येतात.आपल्या व्यवस्थेत काम करणाऱ्यांचा हा अनुभव आहे.आणि मग अश्यावेळी नेमकी आपली ही शिक्षण व्यवस्था ज्या मुलांसाठी काम करते त्या मुलांना आपण पुरेसं देऊ शकलो नाही अशी खंत मनी उरते.

मात्र जगात जिला समस्या नाही अशी व्यक्ती नाही,आणि जिचे समाधान नाही अशी समस्या अस्तित्वात नाही.त्या साठी उपलब्ध साधन स्रोत, जवळ असणारी वेळ,आपल्या समस्येचं स्वरूप या सर्वांच नीट आकलन करून उद्दिष्टाप्रत  पोहचता येतं.

अश्याच नाविन्यपूर्ण संकल्पनेतून आपणा सर्वांना दिशादर्शक,नियोजन पूर्ण एक कृतीकार्यक्रम अमरावती जि. प. शिक्षण सभापती  मा.श्री.जयंतराव देशमुख  ह्यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेला आहे.

सन २०१८-१९ पासून अमरावती जि. प अंतर्गत शाळांसाठी सन्मान प्रेरणेचा-सन्मान गुणवत्तेचा  हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. मी माझ्या शाळा स्तरावर विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याच्या दृष्टीने नेमकं काय करायला हवं ह्याचं  दिशादर्शन ह्यात केलेलं आहे. गुणवत्तेला स्पर्श करणाऱ्या सर्वांगाचा समावेश ह्यात करण्यात आलेला असून जी साधनं आपल्या जवळ उपलब्ध आहे,आवाक्यात आहे त्याद्वारे आपल्याला आपल्या उद्दीष्टापर्यंत नेणारे आहे.
 सन्मान प्रेरणेचा-सन्मान गुणवत्तेचा हा कृती कार्यक्रम आपणा सर्वाना निश्चितच मार्गदर्शक ठरून पं. स.मोर्शी अंतर्गत शाळांना खऱ्या अर्थाने गुणवत्तापूर्ण शाळा करण्यासाठी उपयुक्त ठरेल ,आणि आपण सर्वजण ह्या कार्यक्रमात मनापासून सहभागी व्हाल अशी आशा व्यक्त करते.

सर्व शाळांना सन्मान प्रेरणेचा- सन्मान गुणवत्तेचा या कार्यक्रमासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.💐💐💐
              ग.शि.अ
              पं. स मोर्शी

सोबत सन्मान प्रेरणेचा - सन्मान गुणवत्तेचा प्रपत्र बघण्यासाठी  क्लिक करा.

Wednesday, August 21, 2019

Wednesday, August 21, 2019

शाळा तेथे शेवगा





गुणवत्ता विकासासाठी एक प्रयत्न.......शेवगा लागवड
शरीर माध्यम खलू धर्म साधनम.
      भारतीय उपनिषदांमधून वरील सुभाषित   उद्धृत केलेले आहे. सुदृढ शरीराद्वारेच सर्व गोष्टींची उपलब्धी केली जाऊ शकते, किंबहुना जर शरीर सुदृढ नसेल तर काहीच करण्यात आपले मन लागत नाही. उपाशीपोटी शिक्षण कसे घेणार? याच संकल्पनेतून माध्यान्ह भोजन योजनेची सुरवात झाली.शाळा-शाळांतून किचन शेड उभी राहली, दुपारची  जेवणं सुरु झाली.आणि याचे परिणाम आपण बघतोय. विद्यार्थी पट नोंदणी- उपस्थिती ते शैक्षणिक गुणवत्ता वाढीवर माध्यान्ह भोजन योजनेचा नक्कीच सकारात्मक परिणाम दिसून येतोय.
      शासन विद्यार्थ्यांना अधिकाधिक सकस,दर्जेदार माध्यान्ह भोजन देण्यास प्रयत्नशील आहेच परंतु वैयक्तिक रित्या शाळास्तरावर यासाठी काय करता येईल? यासंदर्भात प्राथमिक शिक्षण विभाग, अमरावतीचे लेखाधिकारी मा.श्री अमोल ईखे यांनी जिल्ह्यातील सर्व शालेय पोषण आहार अधिक्षकांसमोर एक अभिनव प्रस्ताव मांडला तो म्हणजे शाळेतच शेवगा रोप लागवड करणे.  मोर्शी पं.स. च्या गटशिक्षणाधिकारी तथा शा.पो.आ.अधिक्षक अश्विनी पवार यांनी यास सकारात्मक प्रतिसाद देेेऊन तालुक्यातील सर्व शाळांना प्रेेरीत केले.
गुणकारी शेवगा रोपांची लागवड करण्यास मोर्शी पंचायत समिती अंतर्गत शाळांमध्ये सुरवात करण्यात आलेली आहे. आजमितीला सुमारे 40 शाळांमध्ये शेवगा लागवड करण्यात आलेली आहे. आणि या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे श्रीमती अश्विनी पवार यांच्या संकल्पनेतून हे वृक्षारोपण शाळेतीलच शा.पो.आ. स्वयंपाकी आणि मदतनीस ह्यांच्या हस्ते करण्यात आले आहे, जेणेकरून ही रोप जगविण्याची आणि वाढविण्याची अप्रत्यक्ष जबाबदारी त्यांची. आमच्याही हस्ते वृक्षारोपण घेण्यात आले ही सन्मानाची भावना.
शाळा निहाय मागणीनुरूप प्रत्येक शाळेला रोप पुरविणे याचे सर्व नियोजनाचे श्रेय जाते श्री. सूरज अंबाडकर, सहा. शिक्षक जि.प.पूर्व माध्य.शाळा, पिंपरी यांना!






शेवगा वृक्षारोपना काही क्षणचित्रे


लागवड करण्यात आलेली रोप ही कृषी विभागामार्फत कर्नाटक येथून बोलाविण्यात आलेली असून ह्या रोपांना सहा एक महिन्यात फलधारणा होते. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या शेंगा खाण्यास गोड आहेत. रोप उपलब्ध करून दिल्याबद्दल उमरखेड येथील रोपवाटिकेचे कृषिअधिकारी श्री.वानखडे साहेब ह्यांचे शिक्षण विभागातर्फे  आभार.

🌿शेवग्याचे महत्त्व🌿

 शेवग्याचे झाड लावणे आणि त्याची मशागत करणे अगदी सोपे आहे. शेवग्याचे झाड अतिशय लवकर वाढते. भारतामध्ये बहुतेक सर्व उष्ण, आर्द्र हवामान असलेल्या ठिकाणी शेवग्याचे उत्पादन घेतले जाते . शेवग्याच्या शेंगाही वर्षभर बाजारामध्ये उपलब्ध असतात. शेवगा अनेक कारणांस्तव आरोग्याकरिता अतिशय लाभदायक ठरत आहे. त्यामध्ये असलेली पोषक तत्वे मानवी शरीरामध्ये उद्भवणाऱ्या अनेक व्याधी नाहीश्या करण्यास समर्थ असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने शेवग्याला चमत्कारी वृक्ष असे म्हटलेले आहे.

साधारण 100 ग्रॅम इतक्या वजनाच्या शेवग्याच्या वाळलेल्या पानांमध्ये तितक्याच वजनाच्या गाजराइतके अ जीवनसत्व, संत्र्यापेक्षा अधिक मात्रेमध्ये क जीवनसत्व, दुधापेक्षा अधिक मात्रेमध्ये कॅल्शियम, केळ्यामध्ये असते त्यापेक्षा अधिक पोटॅशियम, पालाकापेक्षा अधिक मात्रेमध्ये लोह, आणि दह्यामध्ये असतात त्यापेक्षा जास्त प्रथिने असल्याचे म्हटले जाते. थोडक्यात सांगायचे झाले तर शारीरिक स्वास्थ्यासाठी आवश्यक असलेली बहुतेक सर्व पोषक द्रव्ये शेवग्यामध्ये असल्याने याचा समावेश आपल्या आहारामध्ये करणे गरजेचे आहे. शेवग्यामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्वे आहेत. त्याचबरोबर 8 प्रकारची अमिनो आम्ल, तसेच अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंटस, दाहक विरोधी तत्वे आणि फायटोकेमिकल्स आहेत.

शेवग्याचे आरोग्यदायी फायदे:

💐शेवग्याच्या पानांच्या रसाच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. त्याचबरोबर मधुमेह असणाऱ्या व्यक्तींच्या ग्लुकोज लेवल्स नियंत्रणात ठेवण्यासही शेवग्याच्या पानांचा रस उपयुक्त आहे. शेवग्याच्या पानाचा रस मधाबरोबर घेतल्यास डायरिया, जुलाबावर गुणकारी आहे. या रसामुळे पोटातील कृमींचा नाश होण्यास मदत मिळते. शेवग्याच्या पानांचा रस त्वचेसाठी एन्टीसेप्टिक म्हणूनही वापरला जातो. शेवग्याच्या ताज्या पानांचे लेप करून शरीराच्या ज्या भागावर सूज असेल तिथे बांधल्यास सूज कमी होते. त्याचबरोबर डोकेदुखीचा त्रास उद्भविल्यास शेवग्याची पाने कपाळावर चोळून लावल्यास डोकेदुखी कमी करण्यास  मदत होते.

💐शेवग्याच्या पानांबरोबरच शेवग्याच्या शेंगाही आरोग्यास अतिशय लाभदायक आहेत. या शेंगामध्ये शरीराच्या पोषणासाठी आवश्यक जीवनसत्वे, क्षार आणि इतर पोषक तत्वे आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध आहेत. आपल्याकडे सांबारमध्ये किंवा वेगवेगळ्या भाज्यांमध्ये किंवा निरनिराळ्या डाळींच्या वरणामध्ये शेवग्याच्या शेंगा घालायची पद्धत आहे. शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे हाडांचे आरोग्य सांभाळण्यास मदत होते. आपल्या आहारामध्ये शेवग्याचा नियमित समावेश करीत असलेल्या व्यक्तींची बोन डेन्सिटी उत्तम राहते.

💐शेवगा रक्तशुद्धीसाठीही अतिशय गुणकारी असून त्यामुळे त्वचेचे आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते. घसा खराब असल्यास किंवा ब्रॉन्कायटीस चा त्रास होत असल्यास शेवग्याच्या शेंगा घालून तयार केलेले सूप प्यायल्याने आराम मिळतो. गर्भवती महिलांनी शेवग्याच्या शेंगांचा आपल्या आहारामध्ये अवश्य समावेश करावा. शेवग्याच्या शेंगांमध्ये आणि पानांमध्ये असलेली पोषक तत्वे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास उपयोगी आहेत. या शेंगांमध्ये असलेली बी कॉम्प्लेक्स जीवनसत्वे (नियासिन, रिबोफ्लाविन, फॉलिक असिड) पाचनक्रिया सुधारण्यास मदत करतात.

💐शेवग्याच्या पानांपासून तयार केलेले सूप अस्थमा आजारामध्ये औषधाचे काम करते.
शेवग्याच्या पानांमध्ये जीवनसत्व 'बी' हे तत्त्व विपुल प्रमाणात असते. त्यामुळे 'तोंड येणे' या आजारात शेवग्याच्या पानांचे आहारातून सेवन लाभदायक आहे.
 
💐मधुमेह, मूतखडा यांपासून ते हृदयरोग, कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांमध्ये शेवग्याच्या प्रभावी उपयोग होतो.

💐शेवग्याची पानं, फुलं, फळं, बिया साल आणि मूळ अशा सर्वच गोष्टींचा उपयोग आयुर्वेदिक औषध तयार करण्यासाठी होतो.
कोवळ्या पानांची भाजी आतड्यांना उतेज्जना देवून पोट साफ करते त्यामुळे जठराचा कर्करोग टाळण्यासाठी फायदा होतो.
आतड्यातील जखमा भरून काढण्यासाठी उपयुक्त ठरते.
डोळ्याचा आजार कमी करण्यास मदत होते.
शेवग्याच्या फुलांची भाजी हि संधिवात व हाडाच्या आजारावर फायदेशीर ठरते.
शेवगा तिखट, उष्ण आहे तसेच दीपक पाचक आहे. त्यामुळे आतड्यांचा क्षोभ होऊन त्याबाजूस रक्तप्रवाह अधिक होतो. पाचक रसाचा स्त्राव उत्तम होऊन अग्निमांद्यावर चांगला उपयोग होतो.
शेवग्याच्या सालीचा वास उग्र असतो.शेवग्याच्या सालीचा काढा हा रोगात वापरतात.

💐अग्निदिपनासाठी शेवग्याच्या पानांचा किंवा शेवग्याच्या शेंगांचा वापर भाजीच्या स्वरूपात जेवणात करतात शेवग्यामुळे पोटात आग पडते. मिरे आणि मोहरी यांच्याप्रमाणे शेवग्यामुळे विदाह होतो. हे पदार्थ वारंवार खाण्याने पित्त व रक्त बिघडते आणि. (नाक, तोंड, गुद, मुत्र) शरीरातून रक्त बाहेर येते.
शेवग्याचा पानांचा रस आणि मध मोतीबिंदू (कॅटरॅक्ट) झालेल्या रोग्यांसाठी प्रशस्त आहे.
शेवग्याचा पानांचा रस आणि मध मोतीबिंदू झालेल्या रोग्यांसाठी फायदेशीर ठरतो
शेवग्याच्या शेंगांची भाजी पोटातील कृमी होऊ नयेत व झालेले नष्ट व्हावेत यासाठी खावी.

💐कान वहात असेल तर याची फुले सावलीत वाळवून त्यावे वस्त्रगळ चूर्ण करून कानात घालावे.
गळू झाले असल्यास त्यावर याची साल उगाळून लावल्यास गळू जिरते.
पचनक्रियेशी संबंधित आजार शेवगा सेवनाने नष्ट होतात.
शेवग्याच्या पानांचे चूर्ण कॅन्सर आणि हृदय रुग्णांसाठी उपयुक्त औषध आहे. शेवग्याच्या सेवनाने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.
वाळलेल्या शेवग्याच्या बियांचे चूर्ण पाणी निर्जंतुक करण्यासाठी वापरले जाते.
एक ते तीन वर्षांच्या लहान मुलांना आणि गर्भवती महिलांसाठी शेवग्याला वरदान मानले जाते.
शेवग्याची मुळे जंतनाशक असतात.
शेवग्याचे ज्यूस गर्भवती महिलेला देण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे प्रसूती दरम्यान होणाऱ्या त्रासामध्ये आराम मिळतो आणि प्रसूतीनंतर आईला वेदना कमी प्रमाणात होतात.

💐शेवग्यामध्ये जीवनसत्व 'ए' असते जे सौंदर्यवर्धक स्वरुपात काम करते तसेच डोळ्यांसाठी हे लाभदायक आहे.
चेहऱ्यावर पिंपल्सची समस्या असेल तर शेवग्याचे सेवन करावे.
शेवग्याचे सूप पिल्यास शरीरातील रक्त शुद्ध होते.

श्री. मोहम्मद शरीफ, डॉ. आर. बी. क्षीरसागर व शेख उज्मा ए.
(अन्नतंत्र महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
shareef.foodtech@gmail.com(कडून साभार)


तर आपल्याही शाळेत आपण शेवगा रोप  लावूया,जगवूया आणि शालेय पोषण आहाराचं पोषण मूल्य वाढवूया.
   एक छोटासा प्रयत्न....अशा छोट्या छोट्या प्रयत्नांनीच बरंच काही बदलतं...... चला तर मग एक नवी सुरवात करूया.
          धन्यवाद🙏🙏

Wednesday, August 7, 2019

Wednesday, August 07, 2019

जि.प प्रा.शाळा खेड आणि जि.प.उ.प्रा शाळा दापोरी येथील नाविन्यपूर्ण उपक्रम......

गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आधार - प्रत्यक्ष अनुभवातून करूया साकार



     मोर्शी पं.स.अंतर्गत येणाऱ्या जि.     प.प्रा.शाळा खेड येथे दि.5/08/2019   ला विद्यार्थी सहकारी बचत बँक आणि   शालेय वस्तू भांडार चा  उद्घाटन सोहळा खालील मान्यवरांच्या शुभहस्ते पार पडला.
 या  कार्यक्रमाला
     मा.श्री.सारंगभाऊ खोडस्कर (सदस्य,जि.प.अमरावती),
     मा.श्री.रमेशभाऊ खातदेव (उपसभापती,पं.स   मोर्शी),
     मा.श्रीमती  अश्विनीताई पवार (गटशिक्षणाधिकारी पं. स. मोर्शी),
     मा.श्री सुनीलभाऊ कडू (सदस्य,पं. स.मोर्शी) त्याचप्रमाणे सन्मानीय शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी,पालक वर्ग आदी मान्यवर मंडळी हजर होती.

        

त्याचप्रमाणे जि.प.उच्च प्रा. शाळा दापोरी येथेसुद्धा अशाच नाविन्यपूर्ण  अभिनव उपक्रमांची सुरवात करण्यात आलेली आहे. शिक्षणशास्त्रात म्हटल्याप्रमाणे विद्यार्थ्यांना देण्यात येणारे अध्ययन-अनुभव जेवढी अस्सल असतील तेवढी ती दर्जेदार आणि परिणामकारक ठरतात. मुलं या उपक्रमांद्वारे प्रत्यक्ष प्रक्रियेत भाग घेऊन स्वतःच स्वतः शिकतो.

या उपक्रमाची उद्दीष्टे

1)-विद्यार्थ्याला शाळेमध्ये प्राप्त होणाऱ्या ज्ञानाचा संबंध दैनंदिन जीवनाशी जोडता येणे.

2)-बचतीची सवय लागणे,पैशाचा विनिमय करता येणे.

3)-बँकेच्या व्यवहाराचा प्रत्यक्ष अनुभव येणे.

4)-बँक व्यवहाराशी संबंधित पारिभाषिक शब्दांचा( उदा.डेबिट-क्रेडिट)परिचय होणे.

5)-गणितीय क्रियांची समज येते.शाब्दिक उदाहरणातील क्रिया कळण्यास मदत होते.

6)-शालेय साहित्य भांडारद्वारे ग्रामीण भागातील मुलांना वेळेवर  लेखन साहित्य उपलब्ध होते.सहभागी विद्यार्थ्याला नफा-तोटा हा संबोध प्रत्यक्ष कळतो.

फलश्रुती  

1)-विद्यार्थी स्वतः कृतीयुक्त सहभाग घेतो त्यामुळे त्याला आंनद मिळतो.

2)-विद्यार्थी-विद्यार्थी आंतरक्रिया घडून येते,त्यांच्यामधील समन्वय वाढीस लागतो.

3)- अशा उपक्रमामुळे शाळा-विद्यार्थी नाते दृढ होण्यास मदत होते.

शाळेतील सर्व विद्यार्थी मनापासून आणि आनंदाने अश्या उपक्रमात सहभागी होतात हे वेगळे सांगावयास नको.
   असे अभिनव उपक्रम राबविणाऱ्या सर्व शिक्षक वृंदांचे मनस्वी अभिनंदन आणि पुढील शैक्षणिक कार्यास अनंत शुभेच्छा....💐💐💐

Friday, July 12, 2019

Friday, July 12, 2019

शिक्षण विभाग ,पं. स.मोर्शी च्या संकेतस्थळाचे उदघाटन


"पंचायत समिती मोर्शीच्या शिक्षण  विभागाच्या संकेतस्थळाचे मा. शिक्षण सभापती जिल्हा परिषद, अमरावती यांचे शुभहस्ते उदघाटन"



जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत पंचायत समिती मोर्शीच्या शिक्षण विभागाने नव्यानेच या विभागाचे स्वतंत्र असे  www.educationmorshi.com 
हे शैक्षणिक व प्रशासकीय संकेतस्थळ विकसित केले. मा. श्रीमती मनिषा खत्री, (मुख्य कार्यकारी अधिकारी) जिल्हा परिषद, अमरावती यांच्या प्रेरणेने विकसित केलेल्या या संकेतस्थळाचे औपचारिक उदघाटन आज दिनांक 09/07/2019 रोजी मा.श्री जयंतराव देशमुख (शिक्षण सभापती) जि. प. अमरावती यांच्या शुभहस्ते तसेच मा. श्री रामभाऊ तुरणकर (शिक्षणाधिकारी प्राथमिक) जि. प. अमरावती यांचे उपस्थितीत करण्यात आले.

    सदर संकेतस्थळ श्रीमती अश्विनी पवार (गटशिक्षणाधिकारी) पंचायत समिती, मोर्शी यांच्या नेतृत्वाखाली मोर्शी पंचायत समिती मधील तंत्रस्नेही शिक्षक श्री. मो. मुजाहिद फराज, श्री. सुरज अंबाडकर, श्री. रिजवान सौदागर व श्री. निलेश इंगोले यांनी बाहेरील कोणत्याही तंत्रज्ञाची मदत न घेता तसेच कोणताही खर्च न करता विकसित केले. मोर्शीच्या या तंत्रस्नेही टीमने अत्यंत अभ्यासपूर्वक सर्वसमावेशक असे संकेतस्थळ तयार केल्याबद्दल त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

    उदघाटनपर कार्यक्रमात श्रीमती अश्विनी पवार यांनी सादरीकरण केले. मा. जयंतराव देशमुख यांनी या संकेतस्थळाचे मनापासून कौतुक केले. तसेच हा आपल्या जिल्ह्यातील अभिनव उपक्रम असून अमरावती जिल्हा परिषदेस ही अभिमानाची बाब असल्याचे मत व्यक्त केले. तसेच संपूर्ण जिल्ह्यात उर्वरित पंचायत समितींनी मोर्शी तंत्रस्नेही टीमच्या सहकार्याने याच धर्तीवर संकेतस्थळ विकसित करावे असे निर्देशसुद्धा दिले.

     या उद्घाटन तथा सत्कार सोहळ्यास शिक्षण समिती, जिल्हा परिषद अमरावती चे सन्माननीय सदस्य मा. श्री राजेंद्र पाटील, मा. श्री राजेंद्र बहुरूपी, मा.श्री शाम मसराम , मा.श्रीमती अलकाताई देशमुख, मा. श्रीमती पूजाताई येवले, मा. श्रीमती वैशालीताई बोरकर, मा. श्रीमती शिल्पाताई भलावी तसेच श्री अमोल इखे लेखाधिकारी व जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत सर्व पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी व शिक्षण विभागाचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

  या कार्यक्रमास माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक श्री ज्ञानेश्वर घाटे, श्री जयेश वरखेडे व जि.प. IT cell चे श्री संजय राठी यांचे सहकार्य लाभले.

                

Sunday, June 30, 2019

Sunday, June 30, 2019

टाकाऊ पासुन टिकाऊ


जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक उर्दू शाळा शिरखेड 

येथे टाकाऊ पासुन टिकाऊ उपक्रमाचे आयोजन

Watch Video👉 Click Here                 
 मुलांमध्ये अनेक सुप्त गुण, कला दडलेल्या असतात. त्या गुणांना आकार, रंग, गंध, रूप प्राप्त करुन देण्यासाठी शाळा स्तरावर वार्षिक परिक्षा संपल्या नंतर कला व कार्यानुभव कार्यशाळांतर्गत टाकाऊ वस्तू पासुन टिकाऊ वस्तू
तयार करणे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुलांनी आपल्या परिसरातून  टाकाऊ वस्तू जमा केल्या व शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सुंदर वस्तू तयार केल्या. केंद्र प्रमुख व शा.व्य.समितितील सद्स्यांनी या वस्तूंची पाहणी करून विद्यार्थ्यांच्या कला गुणांचे कौतुक केले. 

Wednesday, May 29, 2019

Wednesday, May 29, 2019

जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा हिवरखेड येथे उन्हाळी छंद शिबिराचे आयोजन

जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा हिवरखेड येथे उन्हाळी छंद शिबिराचे आयोजन करण्यात आले !!!
दि.२२/०४/२०१९ ते २८/०४/२०१९

छंद शिबिरामध्ये सात दिवसांमध्ये
  • योगा, 
  • कार्यानुभव, 
  • कागद काम, 
  • प्लास्टिक बंदी, 
  • कागदी व कापडी पिशव्यांचा वापर, 
  • स्वच्छ शाळा स्वच्छ परिसर, 
  • बौद्धिक खेळ,
  • रंगभरण स्पर्धा, 
  • दानाचे महत्त्व, 
  • गरजवंतांना दान करणे ही भावना बाल मनात रुजविणे, 
  • आरोग्य  विषयी स्वच्छतेचे महत्व,
  • मनोरंजनात्मक खेळ, 
  • विविध स्पर्धा व 
  • सात दिवस सात प्रकारचे विद्यार्थ्यांना फळे वाटप उदाहरणार्थ टरबूज, खरबूज,द्राक्ष, केळी  इ.चे  प्राणायामानंतर वाटप करण्यात आली. 

एकूण 160 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
तसेच,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरखेड येथे छंद शिबिरामध्ये लोकसहभागातून योग टी-शर्ट वाटप करण्यात आले.

 



Wednesday, May 29, 2019

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दापोरी येथे उन्हाळी छंद शिबिराचे आयोजन

दापोरी येथे सुसंस्कार शिबिर संपन्न!
दि.22/04/2019 ते 30/04/2019

         









मोर्शी पासून जवळ असलेल्या दापोरी येथे परीक्षा संपल्यानंतर सुसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले होते. मुलांमध्ये अनेक सुप्त गुण, कला दडलेल्या असतात. त्या गुणांना आकार, रंग, गंध, रूप प्राप्त करुन देण्यासाठी संधी मिळणे गरजेचे असते.
    ही संधी जि.प.पु.मा. शाळा,दापोरीने मुलांना प्राप्त करुन दिली. संस्कार शिबिराचे उदघाटन महान स्वातंत्र्य सैनिक मा. श्री. भास्कर राव ठाकरे यांनी केले. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांची शिस्त बघुन गावकरी आवाक झाले. आम्ही स्वातंत्र्य मिळवून दिले त्याची शान आणि मान राखणे मुलांनो तुमची जबाबदारी आहे असा संदेश त्यांनी दिला..           
शिबिरात दररोज शिक्षण क्षेत्रातील नामवंत शिक्षक मार्गदर्शन करीत होते. 

  • श्री.उद्धवराव शहाणे, यांनी कला विषय शिकवला, कोणत्याही रेषेमधून चित्र कसे निर्माण करावे हे शिकवले. 
  • श्री. बोड़ाखे सर यांनी हस्तकला हा विषय घेऊन मुलांना ग्रीटिंग, फ्लॉवर, आकाश कंदील, फ्लावर पॉट, कसे बनवावे समजून दिले.
  •  श्रीमती दीपाली बाभुळकर, श्री. सचिन अवघड, श्री. मंगेश खेरड़े यांनी बाहुली नाट्य, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु कशा तयार कराव्यात हे शिकविले. 
  • श्रीमती बाभुळकर यांनी  बहुली नाट्यामधून विविध संदेश  मुलाना दिले.
  • मंदाकिनी फोकमारे यांनी असे घडवा मुलानो व्यक्तिमत्व या बाबत मुलांना माहिती दिली. 
  • शिबिरात संगीत खुर्ची, नृत्य, संगीत, मडका फोड़, पुष्प प्रदर्शन, डिश सजावट, रांगोळी स्पर्धा घेण्यात आली.                            
  • शिबिराचा समारोपिय कार्यक्रम मोठ्या आनंदाने पार पडला.या कार्यक्रम करीता मा. अश्विनी ताई पवार अधीक्षक शा पो आ , आनंद राव घोंगड़े, बड़वाईक साहेब हजर होते. 
  • विविध स्पर्धेत भाग घेतलेल्या मुलांना बक्षीस देण्यात आले. श्री भास्कर राव ठाकरे यांनी मुलांना 2000हजार रुपये बक्षीस रुपात  दिले. 
  • मुख्याध्यापक श्री. गजानन चौधरी यांनी शिबिराचे महत्व विशद केले. 
  • शिबिरात रोज श्री.दिनेश श्रीराव सर यांनी योगावर्ग  घेतला. 
  • हस्ताक्षर सुधारण्यासाठी  श्री. पखाले सर यांनी मेहनत घेतली. 
  • सौ विजया पुंड, माधुरी घोंगड़े, संध्या दरोकार, पुष्पा काले, गावकरी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,उपाध्यक्ष, सदस्य यांनी प्रयत्न केले.